Monday, April 12, 2010

लाभले आम्हांस भाग्य..

सध्या मराठी समाजात दोन प्रकारच्या प्रवृति आहेत.

एक त्या लोकांची आहे, जे मराठीच्या माणसाच्या नावाने नुसताच टाहो फोड़त आहेत आणि आपला राजकीय स्वार्थ साधत आहेत. मराठी माणसाची कशी गळचेपी होत आहे, त्याच्या हक्कावर कसे अतिक्रमण होत आहे, त्याला कशी किंमत दिली जात नाही, हे सध्या 'हॉट टॉपिक' आहेत. त्यावर सिनेमा काढला तर हीट होतो, त्यावर भाषणे ठोकून, गर्दी जमवून, शक्तिप्रदर्शन करता येते. निवडणुकीत आश्वासने दिली जातात. 

दूसरी त्या लोकांची आहे, जे असा टाहो तर फोड़त नाहीत, पण स्वत:च्याच मार्गाने चालून मराठी संस्कृतीला आणि वैभवाला जपतात. अतुल कुलकर्णी सारखे कलाकार, संदीप खरे सारखे कवी, अजय-अतुल सारखे संगीतकार, बेला शेंडे सारख्या गायिका, सोनाली कुलकर्णी सारख्या नृत्यांगना, फुलवा सारख्या नृत्यदिग्दर्शिका आणि या सर्वाना दिलखुलास दाद देणारा मराठी रसिकवर्ग ! इतकच काय सचिन तेंडुलकर, अतुल कसबेकर, अंजली भागवत, विक्रम पंडित, आणि यादी नुसती लांबतच जाते. मराठी बाणा सारखी संगीत नाटके पाहिली की अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येते. अभिमान वाटतो अश्या मराठी संस्कृतीत जन्माला आल्याचा. आणि हा अभिमान नुसत्याच वैभवशाली इतिहासावर आधारित नसून, आताच्या जगात मराठी माणसाची मान उंच करणाऱ्या व्यक्तींचा आहे.

कुठली प्रवृति अवलंबायची हे सर्वस्वी मराठी माणसाच्या हातात आहे, 'आपण कसे बिचारे' म्हणून भांडत बसायचे की या दिग्गजांच्या पावलावर पाउल ठेवून काही बनण्याचा प्रयत्न करायचा. 'प्रयत्नांती परमेश्वर' ही शिकवण देणाऱ्या आपल्या मराठी संस्कृतिची जर कोणी नासधूस करू शकत असेल तर फक्त 'मराठी कशी down market' अशी प्रवृति असणारा मराठी माणूसच!

No comments:

Post a Comment

Comments Welcomed...